लंडन ब्रिज: ठार झालेला हल्लेखोर दहशतवादी छावणीचा चालक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/london-bridge.jpg)
‘लंडन ब्रिज’ दहशतवादी हल्ल्यात शुक्रवारी दोन जण ठार झाल्यानंतर यातील आरोपीला गोळीबारात ठार करण्यात आले असून तो यापूर्वी दोषी ठरवण्यात आलेला दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी त्याने लंडन शेअरबाजारात हल्ल्याचा कट आखल्याच्या आरोपावरून सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
त्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या जमिनीवर दहशतवादी प्रशिक्षण केंद्रही चालवले होते. या संशयिताचे नाव उस्मान खान असून त्याने ब्रिटनच्या संसदेवर मुंबईसारखा हल्ला करण्याची चर्चाही केली होती. त्याच्यापासून दहशतवादाचा मोठा धोका असल्याचे मत २०१२ मध्ये त्याने केलेल्या गुन्ह्य़ाच्या सुनावणीत न्यायाधीशांनी व्यक्त केले होते. खान हा २०१८ मध्ये पॅरोलवर सुटला होता. त्याने शुक्रवारी एक पुरुष व एक महिला यांना ठार केले, तर इतर तीन जणांना जखमी केले. नंतर सशस्त्र पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार केले.