रिमोटवरुन भावाशी भांडण, बहिणीची आत्महत्या
![गावठी हातबॉम्ब स्फोटात एकाचा मृत्यू, दोघे जखमी ; माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील घटना](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Deadbody.jpg)
टीव्ही रिमोटवरुन भाऊ-बहिणीमध्ये झालेल्या छोटा वाद बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. अवघ्या १२ वर्षांच्या बहिणीने रागाच्या भरात गळफास घेतला. तीन भाऊ-बहिणीत सर्वांत मोठ्या असलेल्या भावाने गळफास घेतलेल्या बहिणीला रुग्णालयात दाखल केले. तीन दिवसानंतर उपचार सुरु असताना अखेर बहिणीने अखेरचा श्वास घेतला. ही खळबळजनक घटना दिल्ली येथे घडली.
दिल्लीतील सीलमपूर भागातील ही घटना असून बुधवारी मृत मुलगी आणि तिचे दोन भाऊ घरी एकटे होते. बहिणीचा तिच्या ७ वर्षांच्या भावाबरोबर टीव्हीच्या रिमोटवरुन वाद झाला. त्यावेळी त्यांच्या १७ वर्षांचा मोठा भाऊ आपल्या खोलीत अभ्यास करत होता. त्यांचे पालक बाहेर गेले होते. सांयकाळी ५.५५ वाजता मुलीने आपल्या भावाला रिमोट मागितला. यावरुन दोघे भांडू लागले. मोठ्या भावाने दोघांना रागावले आणि शांत राहण्यास सांगितले.
सहा वाजताच मुलीने तिचा आवडीचा कार्यक्रम पाहायचा म्हणून पुन्हा रिमोट मागितला. त्यावेळी भावाने पुन्हा नकार दिला. यावरुन नाराज बहिणीने भावाला चापट मारली आणि आई-वडिलांच्या खोलीत निघून गेली. छोट्या भावाने तिला रोखण्याचा प्रयत्न केला. पण ती थांबली नाही. छोट्या भावाने मोठ्या भावाला बोलावले. त्याने दरवाजा उघडला असता बहिणीने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. त्याने त्वरीत तिला खाली उतरवले. त्याने तिला रुग्णालयात दाखल केले. तीन दिवस तिची प्रकृती गंभीर होती. अखेर तिने रविवारी अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.