राज बब्बर यांनी नक्षलवाद्यांना म्हटले ‘क्रांतीकारी’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/raj-babbar-6.jpg)
विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला करुन खळबळ उडवून दिली आहे. राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी नक्षलवाद्यांवरुन वादग्रस्त वक्त्व्य केले आहे. ते लोक क्रांतीसाठी बाहेर पडले आहेत. त्यांना रोखले जाऊ शकत नाही, असे ते छत्तीसगडमधील नक्षलवादावर बोलताना म्हणाले.
नुकताच दंतेवाडा येथे नक्षली हल्ल्यात एका कॅमेरामनचा मृत्यू तर दोन जवान शहीद झाले होते. नक्षलवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध सर्वचस्तरातून करण्यात आला होता. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, जे दुर्लक्षित होते आणि ज्या लोकांना त्यांचा अधिकार मिळत नाही. ज्यांचा अधिकार हिसकावून घेतला जातो, वरच्या स्तरावरील काही लोक त्यांचा अधिकार हिसकावतात तेव्हा ते आपल्या प्राणांची आहुती देतात.
नंतर थोडंस सावरत ते म्हणाले की, ते चुकीचे करतात. कारण ना त्यांच्या बंदुकीने समस्येचे निवारण होणार नाही. ना आपल्या बंदुकीने उत्तर मिळणार नाही. चर्चेनेच हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. घाबरवून, चमचेगिरी, हुसकावून किंवा आमिष दाखवून क्रांतीसाठी निघालेल्या लोकांना रोखता येऊ शकत नाही. अधिकारांवरुन नक्षल आंदोलन सुरु झाले आहे. त्यांना एकत्र घेऊन चर्चा केली पाहिजे. जे मार्गावरुन भटकले आहेत. त्यांना परत आणले पाहिजे.