राजस्थानात रस्त्यावर सापडलं मतदान यंत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/evm-machine.jpg)
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर रस्त्यावर मतदान यंत्र सापडल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाने या अक्षम्य दुर्लक्षासाठी दोन निवडणूक अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांना निलंबित केले आहे. राजस्थानच्या बारन जिल्ह्यात किशनगंज विधानसभा मतदारसंघातील शाहाबाद भागात एक मतदान यंत्र रस्त्यावर पडलेले होते.
या प्रकरणी रात्री उशिरा आदेश काढून अब्दुल रफीक आणि नवल सिंह पटवारी या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. मतदान यंत्रांच्या विश्वासहर्तेबद्दल विविध राजकीय पक्षांच्या मनात संशय असताना हा प्रकार समोर आला आहे. सापडलेल्या मतदान यंत्राचा मतदानासाठी वापर झाला होता का? कि, ते राखीव होते ते अजून स्पष्ट झालेले नाही.
राखीव असलेले मतदान यंत्र ट्रकमधून रस्त्यावर पडले असावे असा अंदाज जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनी व्यक्त केला. राजस्थानमध्ये शुक्रवारी विधानसभेच्या २०० पैकी १९९ जागांसाठी मतदान झाले. ७२.७ टक्के मतदान झाले असून एकूण २,२७४ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी ५२ हजार मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. मतदानासाठी २ लाख मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर करण्यात आला. येत्या ११ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.