रशियावरील निर्बंध कायम राहणार – ट्रम्प यांचे स्पष्टीकरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/USA-RUSSIA-696x4.jpg)
वॉशिंग्टन – रशियावर अमेरिकेने घातलेले निर्बंध कायम राहतील असे स्पष्टीकरण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. इटालियन पंतप्रधानांसमवेत व्हाईट हाऊस येथे घेतलेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेच्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की अमेरिका युरोपातील ज्या देशांचे रक्षण करते आहे तेच देश रशियाला अब्जावधी रूपयांची मदत करीत आहेत, ही चांगली बाब नाही.
असे कोणते देश आहेत की जे निर्बंध झुगारून रशियाला मदत करीत आहेत असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी जर्मनीचे नाव घेतले. ते म्हणाले की हे देश नाटोची वर्गणीही देत नाहीत. त्यामुळे नाटो संघटनेची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. पण यावेळी मी जरा कडक भाषेत त्यांना नाटोचा निधी देण्याची सुचना केली त्यावेळी त्त्यांनी अब्जावधी डॉलर्सचा निधी नाटो संघटनेला दिला आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. नाटो त्यामुळे आता अधिक मजबूत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नाटो मध्ये सर्वांना समान वागणूक दिली जाईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले. रशियाच्या संबंधांविषयी बोलताना ते म्हणाले की मी त्यांची हेलसिंकी येथे भेट घेतली. ही भेट अत्यंत विधायक वातावरणात झाली पण माध्यमांनी त्याला महत्व दिलेले नाही. असे असले तरी रशियावरील निर्बंध कायमच राहतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.