येमेनमधील बंडखोरांच्या क्षेपणास्त्र,आत्मघातकी हल्ल्यात ५१ ठार
एडन : येमेनमधील बंडखोरांनी गुरुवारी एडनमधील लष्कराच्या संचलनावर आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले आणि त्याच वेळी अन्य शहरातील एका पोलीस ठाण्यावर केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान ५१ जण ठार तर अनेक जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ब्रेइका येथे लष्कराचे संचलन सुरू असताना तेथे आंतरखंडीय क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. हौथी बंडखोरांच्या अल-मसिराह या संकेतस्थळाने ब्रिगेडियर जन. येहिआ सारिया यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, बंडखोरांनी संचलनावर मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागली त्यामध्ये लष्करातील कमांडरांसह अनेक जण ठार झाले. यूएईने पाठिंबा दिलेले कमांडर मोनिअर अल याफी यांचे संचलनाच्या ठिकाणी भाषण सुरू होते, तेही या हल्ल्यात ठार झाले.
त्यापूर्वी स्फोटकांनी भरलेली एक गाडी, बस आणि दुचाकी यांच्यामार्फत ओमर अल-मोख्तार येथील पोली ठाण्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. हा हल्ला चार आत्मघातकी हल्लेखोरांनी केला. कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पोलीस ठाण्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात ११ जण ठार, तर २९ जण जखमी झाले.