मेक्सिकोत आतषबाजीवेळी झालेल्या स्फोटात 24 ठार

मेक्सिको – मेक्सिको सिटीच्या उत्तरेला एका शहरात आतषबाजीच्या वेळी झालेल्या स्फोटांच्या मालिकेत 24 ठार तर इतर 49 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतांमध्ये अग्निशामक दलाचे चार जवान व दोन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या स्फोटात चार लहान इमारती पडल्या आहेत.
या स्फोटांचे चित्रण जवळच्या महामार्गावरून करण्यात आले असून टुल्टेपेक शहरातील स्फोटातून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. मेक्सिको सरकारने म्हटले आहे की, टुल्टेपेक येथील काही लोक यात मारले गेले असून सहा आपत्कालीन कर्मचारी व इतर दोघांची अजून ओळख पटलेली नाही. मृतांचा आकडा 24 सांगण्यात आला असून मेलेले इतर लोक कोण हे अद्याप समजलेले नाही. सकाळी 9.40 वाजता पहिला स्फोट झाला. त्यानंतर सकाळी 10 वाजता तीन शक्तिशाली स्फोट झाले.
नागरी संरक्षण संस्थेचे लुइस फीलीप प्युंटे यांनी सांगितले की, चार स्फोट झाले असून एका अनधिकृत कार्यशाळेत चार स्फोट झाले. जूनमध्ये झालेल्या स्फोटात याच शहरात सात ठार, तर आठ जण जखमी झाले होते.





