To The Point : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला आता ‘गळती’चा धोका!
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची अस्वस्थता : ‘बॅक टू होम’ साठी अनेकांची अजित पवार यांच्याकडे ‘साखरपेरणी’
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही मतदार संघात सपाटून मार खाल्ल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक महत्त्वाकांक्षी माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ‘साखर पेरणी’ सुरू केली आहे. महानगरपालिका निवडणुकीत आपली जागा ‘सेफ’ करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाकांक्षी मान्यवर आणि माजी नगरसेवक शरद पवार गटातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे लक्षवेधी कामगिरी केली. या निवडणुकीतील ‘स्ट्राईक रेट’ विधानसभा निवडणुकीत कायम राहील, या अपेक्षेने शहरातील अनेक मातब्बर इच्छुकांनी अजित पवारांची साथ सोडली आणि तिकीटही मिळवले.
भोसरी मतदार संघातून तब्बल ४० माजी नगरसेवकांची फौज सोबत घेवून अजित गव्हाणे यांनी ‘तुतारी’ खेचून आणली. तर पिंपरीत सुलक्षणा शिलवंत यांना पक्षनिष्ठा या मुद्यावर तिकीट मिळाले. अत्यंत चर्चेत असलेल्या चिंचवडच्या जागेच्या तिकीटासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचे मित्र व माजी नगरसेवक राहुल कलाटे यांची वर्णी लावली. या राजकीय घमासानमध्ये शहरातून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांना संधी मिळाली नाही.
आमदार करणार विरोधकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’…
दरम्यान, चिंचवडमध्ये सुमारे १ लाख ३ हजार ८७१ मतांनी, पिंपरीत ३६ हजार ६८८ मतांनी आणि भोसरी मतदार संघात ६३ हजार ७९१ मतांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. शहरातील तीनही मतदार संघांमध्ये मोठी ताकद आहे, असा केलेला दावा त्यामुळे फोल ठरला. महायुतीने तीनही जागांवर वर्चस्व मिळवले. हाच ‘ट्रेंड’ महानगरपालिका निवडणुकांमध्ये राहील. किंबहुना, राज्यात आणि केंद्रात महायुतीची निर्विवाद सत्ता असल्यामुळे महापालिकेत महायुती सत्तेत येणार, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे ‘तुतारी’मध्ये दाखल झालेले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पुन्हा अजित पवार यांच्याच्या गटात सामील होण्याच्या तयारीत आहेत. मात्र, महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवल्यास या मान्यवरांना भाजपाशीच दोन हात करावे लगणार आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार स्वत:च्या समर्थकांना तिकीटाला प्राधान्य देणार आणि विरोधात गेलेल्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार आहेत, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
शहराध्यक्षपदाच्या बदलासाठी रस्सीखेच…!
‘‘पदांशिवाय राहुच शकत नाहीत..’’ अशा मानसिकतेमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात दोन-तीन गट निर्माण झाले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत आपल्या समर्थकांना ताकद द्यायची असेल, तर संघटनात्मक पातळीवर शहराध्यक्षपद आपल्या ताब्यात असायला हवे, असा काही नेत्यांचा मानस आहे. त्यातच, विधानसभा निवडणुकीत शहरामध्ये विद्यमान शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी लक्षवेधी कामगिरी केली नाही. त्यांच्याजागी अनुभवी आणि संघटन बांधणारा नेता असावा, असा ‘मॅसेज’ अगदी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. दुसरीकडे, कामठे यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे ‘‘ मला पदमुक्त करावे आणि प्रभागात काम करण्यासाठी ताकद द्यावी’’ अशी मागणी केल्याचे सांगितले जाते. चिंचवडमधून राहुल कलाटे आणि भोसरीतून अजित गव्हाणे समर्थक शहराध्यक्षपद खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.




