मुलांची चोरी केल्याच्या संशयातून जमावाने महिलेचा घेतला जीव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/MARHAN-MURDER-1.jpg)
अहमदाबाद: गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये जवळपास 700 लोकांच्या जमावाने एका 45 वर्षीय भिकारी महिलेला मारहाण करून तिचा जीव घेतला आहे. मारहाण केलेली महिला मुलांची चोरी करत असल्याचा जमावाला संशय होता. पोलिसांच्या माहितीनुसार, शांता देवी नावाची महिला इतर तीन सहकारी महिलांबरोबर भीक मागण्यास चालली होती.
त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये अशी अफवा पसरली की, ही महिला मुलांची चोरी करते. त्यानंतर पाच ते सहा जणांनी तिच्यावर हल्ला चढवला. पाहता पाहता तिथे 700 लोकांचा जमाव गोळा झाला. काही जणांनी त्या भिकारी महिलेची केसं ओढली आणि तिला काठीनं मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत भिकारी महिलेला सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुलांची चोरी करत असलेल्या अफवेने अनेकांना मारहाण करण्यात आलेली आहे. त्यामुळे राग अनावर झालेल्या जमावाच्या हल्ल्यात अनेक निर्दोष लोक मारले जात आहेत. आसाम, कर्नाटक, छत्तीसगडसह देशातील अनेक राज्यांमध्ये अशी प्रकरणं समोर आली आहेत.