मुदत वाढवून देण्यासाठी आटापिटा…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/neta-1-3.jpg)
नवी दिल्ली – न्यायालयाने येडियुरप्पा सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्या चार वाजेपर्यंतची वेळ दिली. त्यावर भाजपचे वकिल मुकुल रोहतगी यांनी ही मुदत वाढवून मिळावी अशी आर्जवे केली. एक दोन दिवसात हे शक्य नाही असे ते म्हणाले. कॉंग्रेस आणि जेडीएसने आमदारांना राज्याबाहेर हलवले आहे त्यांना येथे परत आणण्यासाठीही एक दिवसाची मुदत पुरेशी नाही असेही रोहतगी यांनी सांगून पाहिले. पंधरा दिवस नाही तर आठवड्याची तरी मुदत मिळावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली पण न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य केले नाहीं.
कॉंग्रेस आणि जेडीएसच्या राज्याबाहेर नेलेल्या आमदारांचा विषय रोहतगी यांनी उपस्थित करताच कॉंग्रेसचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी, आम्ही उद्या बहुमताच्या चाचणीसाठी तयार आहोत असे न्यायालयात ताबडतोब स्पष्ट केले. भाजपकडे बहुमत असले तरी भाजपने त्यांच्या समर्थक आमदारांची यादी आज न्यायालयात सादर केली नाही त्यावर रोहतगी म्हणाले की विधानसभेच्या सभागृहातच ही बाब सिद्ध होईल. त्यावर न्यायालयाने मग उद्याच ते सिद्ध करा असे नमूद करीत त्यांनी उद्या चार पर्यंतची मुदत दिली.