मुंबई महापालिका दलालांमार्फत पैसे उकळत आहे, भाजप पर्दाफाश करणार : प्रवीण दरेकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Pravin-Darekar-new.jpg)
मुंबई | महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेवर दलालांमार्फत कोविड रुग्णालयांचे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी त्यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या विषयावरुन शिवसेनेवर टीका केली. प्रवीण दरेकर यांनी आज (8 ऑगस्ट) मुलुंड पश्चिम आयबीएस रोड येथील जम्बो कोविड रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
प्रवीण दरेकर म्हणाले, “जम्बो कोविड सेंटरचं 7 जुलैला उद्घाटन झालं, परंतु अजून देखील येथे आयसीयू कक्ष नाहीत. एजन्सीमार्फत लूटमार सुरु आहे. या एजन्सीने 10 पट पैसे आकारण्याचे काम केले आहे. यात मुंबई महापालिकेचाही समावेश आहे. 100 बेड असतील, तर 400 बेडची बिलं लावली जात आहेत. मुंबई महापालिका दलालांमार्फत कोविड रुग्णालयांचे पैसे उकळत आहे. भाजप याचा पर्दाफाश करणार आहे. मुंबईकरांचे अवाजवी पैसे जाणार नाहीत. डॉक्टर आणि नर्सेसचे देखील अनेक प्रश्न आहेत.”
“वराती मागून घोडे नाचवण्यात काही अर्थ नाही. 90 टक्के कोकणवासीय हे अर्धे कोकणात पोहचले आहेत. अजूनपर्यंत बसेसची बुकिंग नाही. ते 14 दिवस क्वारंटाईनचा त्रास भोगत आहे. शिवसेनेसाठी मुंबईच्या चाकरमान्यांचे योगदान मोठे होते. त्याच चाकरमान्यांना शिवसेनेचे नेते विनायक राऊत येऊ नका म्हणून सांगतात. शिवसेनेला कोकणवासीयांचा काहीही पुळका आला नाही. मी दौरा केल्यानंतर राज्यपालांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे ही मदत झाली आहे,” असंही प्रवीण दरेकर म्हणाले.