मार्क झुकेबर्गनी युरोपियन संघाची मागितली माफी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/mark-zukerbarg-.jpg)
ब्रुसेल्स – फेसबुकचा वापर करणाऱ्यांची माहिती चोरली गेल्याबद्दल मुख्य कार्यकारी मार्क झुकेरबर्ग यांनी युरोपिय संघाची माफी मागितली आहे. अशाप्रकारे फेसबुक वापरणाऱ्यांची माहिती पुन्हा चोरली जाऊ नये, यासाठी उपाय योजना केल्या जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केंब्रिज ऍनालिटीका प्रकरणानंतर झुकेरबर्ग यांना पश्चाताप झाला होता. एप्रिल महिन्यात अमेरिकेच्या संसदेमध्ये या प्रकरणावरून गदारोळ सुरू झाला होता.
गेल्या दोन वर्षांमध्ये फेसबुकच्या एक्झिक्युटिव्हजनी डाटा चोरी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत, असेही त्यांनी ब्रुसेल्समध्ये सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कबूल केले.
“फेसबुकच्या चोरलेल्या डाटाचा उपयोग खोट्या बातम्या, निवडणूकांमधील विदेशी हस्तक्षेप किंवा नागरिकांच्या माहितीच्या गैरवापरासाठी केला गेला. यासंदर्भात आम्ही आमची जबाबदारी पाळण्यासाठी व्यापक दृष्टीकोन अवलंबला नाही. ही चूक होती आणि मी त्याबद्दल माफी मागतो.’ असे झुकेरबर्ग म्हणाले. फेसबुकचा वापर करणाऱ्यांपैकी सुमारे 8 कोटी 70 लाख ग्राहकांची माहिती ब्रिटीश कन्सल्टन्सी केंब्रिज ऍनालिटीकाने चोरली असावी, हे फेसबुकने कबूल केले आहे. केंब्रिज ऍनालिटीका ही कंपनी अमेरिकेत अध्यक्षांच्या निवडणूकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी कार्यरत होती.
युरोपिय संघाने वैयक्तिक डाटा सुरक्षेसाठी नवीन नियम केले आहेत. त्याचे झुकेरबर्ग यांनी स्वागत केले आहे. फेसबुकवरही डाटा सुरक्षेसाठी “क्लीअर हिस्ट्री’सारखे नवीन फिचर आणण्यात येणार आहेत. या उपाय योजनांसाठी फेसबुकमध्ये नव्याने गुंतवणूक केली जाईल, असेही झुकेरबर्ग यांनी युरोपियन संसदेच्या राजकीय गटाला सांगितले.