माजी सरन्यायाधीश मिश्रा यांच्यावर ‘रिमोट कंट्रोल’
निवृत्त न्या. कुरियन जोसेफ यांचा खळबळजनक आरोप
माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर कुठल्या तरी बाह्य़ सूत्राचा ‘रिमोट कंट्रोल’ चालत होता आणि त्यामुळे न्यायदानावर परिणाम होत होता, असा खळबळजनक दावा नुकतेच निवृत्त झालेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सोमवारी केला. मात्र, हे ‘बाह्य़ सूत्र’ कोण होते आणि कोणत्या प्रकरणांबाबत पक्षपात करण्यात आला हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
तथापि, चार न्यायमूर्तीच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेनंतर न्या. मिश्रा यांच्या सरन्यायाधीशपदाच्या नंतरच्या कारकीर्दीत परिस्थितीत चांगला बदल होण्यास सुरुवात झाली, असेही न्या. जोसेफ यांनी लगेच स्पष्ट केले.
तत्कालीन सरन्यायाधीश कुठल्या तरी बाह्य़ सूत्राच्या प्रभावाखाली काम करत होते. या सूत्राचा त्यांच्यावर ‘रिमोट कंट्रोल’ चालत होता. कुठल्या तरी बाह्य़ सूत्राच्या प्रभावामुळे न्यायदानावर परिणाम होत होता, असे २९ नोव्हेंबरला निवृत्त झालेले जोसेफ यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांचे ‘मर्जीनुसार’ वाटप केले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी ज्या चार न्यायमूर्तीनी १२ जानेवारीला ऐतिहासिक पत्रकार परिषद घेतली होती, त्यात जोसेफ यांचा समावेश होता. त्यानंतर निवृत्त झालेले जे. चेलमेश्वर, विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि मदन लोकुर हे इतर न्यायाधीश होते.
आपण कोणत्या आधारावर हा दावा करत आहात असे विचारले असता जोसेफ म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाला भेडसावणाऱ्या मुद्यांवर जाहीरपणे भूमिका मांडणाऱ्या न्यायाधीशांमध्ये, तसेच इतर न्यायाधीशांमध्येही अशी भावना होती. हे बाह्य़ सूत्र कोण होते, तसेच कोणत्या प्रकरणांमध्ये पक्षपात होऊन न्यायदानावर परिणाम झाला, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. तथाकथित प्रभाव एखाद्या विशिष्ट प्रकरणात एखाद्या राजकीय पक्षाकडून किंवा सरकारकडून टाकण्यात आला काय असे खोदून विचारले असता, संबंधित न्यायमूर्तीकडून पक्षपात करण्यात येत होता असल्याचे संबंधित न्यायाधीशांचे मत होते, एवढेच जोसेफ यांनी सांगितले.
सरकार सर्वोच्च स्तरावरील न्यायपालिकेत हस्तक्षेप करत असल्याचे आपले आरोप जोसेफ यांच्या वक्तव्यांमुळे सिद्ध झाले असल्याचे सांगून काँग्रेसने या प्रकरणाच्या संसदीय समितीमार्फत, चौकशीची मागणी केली.