माजी क्रिकेटपटू कपिल देव भाजपमध्ये प्रवेश करणार ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/cricketer-kapil-dev-meets-bjp-president-amit-shah.jpg)
नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार, माजी क्रिकेटपटू कपिल देव राजकारणात प्रवेश करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला. याचे कारण म्हणजे कपिल देव यांच्या निवासस्थानी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी लावलेली हजेरी.
अमित शाहांनी शुक्रवारी रात्री कपिल देव यांच्या घरी घेतलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कपिल देव भाजपचा झेंडा खांद्यावर घेणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र कपिल देव यांनी या शक्यता नाकारल्या आहेत. मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कामकाजावर अमित शाह यांनी बातचित केली, मात्र राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे कपिल देव यांनी सांगितले.
सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी अमित शाह आले होते. मात्र भाजपला समर्थन देण्याबाबत किंवा निवडणूक लढवण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे कपिल देव यांनी स्पष्ट केले. मी सध्या भाजपमध्येच काय, राजकारणातही प्रवेश करत नाही, 2019 लोकसभा निवडणुकांबाबत कोणताही विचार नाही, असे कपिल देव म्हणाले.