महाभियोगानंतर अमेरिका संकटात आल्याचा ट्रम्प यांचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/trump01.jpg)
विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने महाभियोग चौकशीचे हत्यार उगारल्यामुळे अस्वस्थ झालेले अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, देश कधी नव्हे एवढा संकटात असल्याचा इशारा आपल्या समर्थकांना दिला आहे.
ट्विटरवर त्यांनी शनिवारी टाकलेल्या चित्रफीत संदेशात म्हटले आहे, की ‘२०२० मधील अध्यक्षीय उमेदवारीचे दावेदार जो बिदेन यांना घोटाळ्याच्या प्रकरणात अडकवण्यासाठी युक्रेनच्या अध्यक्षांना दूरध्वनी केल्याच्या प्रकरणात विरोधी डेमोक्रॅट्सनी महाभियोग चौकशी सुरू करून व्हाइट हाऊसवर दबाव वाढवला. त्यामुळे अमेरिकेत डेमोक्रॅट सदस्यांनी लोकांचे हक्कच धोक्यात आणले असून ते तुमच्या बंदुका, आरोग्य सेवा, तुमची निवडणुकीतील मते, तसेच स्वातंत्र्यही हिरावून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. पण आम्ही हे होऊ देणार नाही. यात देशाचे सर्वस्व पूर्वी कधी नव्हे असे पणाला लागले आहे. मी तुमच्यासाठी लढतो आहे, त्यामुळे विरोधक हात धुवून मागे लागले आहेत पण मी त्यांना हार जाणार नाही. विरोधकांनी सुरू केलेली महाभियोग चौकशी हा सूडाचा भाग असून महाभियोग चौकशीत प्रमुख असलेले डेमोक्रॅटिक सदस्य अॅडम शिफ यांनी मला बदनाम केले. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला पाहिजे.’