महाभियोगप्रकरणी तक्रारकर्त्यांस भेटण्याची ट्रम्प यांची इच्छा
वॉशिंग्टन : महाभियोगास कारण ठरलेली तक्रार देणाऱ्या जागल्यास (व्हिसलब्लोअर) भेटण्याची इच्छा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.
या जागल्याचे नाव गुप्त ठेवणे अपेक्षित असताना अमेरिकेतील काही वृत्तपत्रांनी ते जाहीर करून पत्रकारितेच्या संकेतांचे आधीच उल्लंघन केले आहे. ट्रम्प हे महाभियोग चौकशी प्रकरणी गेला आठवडाभर शांत होते, पण त्यांनी काल सायंकाळी काही ट्विट संदेश जारी करून डेमोक्रॅटिक सदस्य व माध्यमांवर आगपाखड केली. ट्रम्प यांनी युक्रेनच्या अध्यक्षांना जुलैत फोन करून जो बिदेन व त्यांच्या मुलाच्या उद्योग व्यवसायांची चौकशी करून त्यांच्या पाठीमागे तपासाचे शुक्लकाष्ठ लावण्यास सांगितले होते. बिदेन व त्यांच्या मुलाचे युक्रेनमध्ये उद्योग व्यवसाय आहेत. २०२० च्या निवडणुकीत बिदेन हे अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असू शकतात. हे सगळे प्रकरण उघड झाले असताना त्या दूरध्वनी संभाषणाची लिखित प्रतही आता उघड झाली आहे. ट्रम्प यांनी त्यांचे महाधिवक्ता व व्यक्तिगत वकील यांनाही बिदेन यांना चौकशीत अडकवण्यासाठी वापरून घेतल्याचे उघड झाले. या दूरध्वनी संभाषणाची ठोस माहिती असलेल्या जागल्याने याबाबत ऑगस्टमध्ये तक्रार केली होती. ट्रम्प यांनी निवडणुकीत परकीय शक्तींचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप तक्रारीत आहे.
ट्रम्प यांची भूमिका
‘कुठल्याही अमेरिकी व्यक्तीला जसे अधिकार आहेत तसेच मला आहेत, त्यामुळे माझ्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तीला मी भेटणार आहे. हा आरोप करणारा जागल्या म्हणजे व्हिसल ब्लोअर आहे. त्यामुळे त्याला भेटायलाच हवे’, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी ट्विट संदेशात असे म्हटले आहे, की ‘काँग्रेसने सुरू केलेल्या महाभियोग चौकशीत प्रमुख भूमिकेत असलेले अॅडम शिफ यांनी गेल्या आठवडय़ात काँग्रेसला सगळे खोटेच सांगितले. त्यांना खरेतर शिक्षा केली पाहिजे. घोटाळा व देशद्रोहाच्या आरोपाखाली शिफ यांची चौकशी व्हायला हवी.’