मसूदच्या सुटकेचा निर्णय मनमोहन सिंग आणि सोनिया गांधीना मान्य होता – अमित शहा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/20-amit-shah_5.jpg)
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची सुटका कोणी केली ? असा प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या ब्लॉगमधून काही गोष्टींची आठवण करुन दिली आहे. विमान अपहरणाच्या घटनेनंतर तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग दोघेही उपस्थित होते.
देशाच्या भावनेचा विचार करुन त्यावेळी सर्वपक्षांनी मिळून मसूद अझहरची सुटका करण्याचा आणि प्रवाशांना परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता असे शाह यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची होती. मसूद अझहरची सुटका का केली ? हा प्रश्न उपस्थित करुन दुर्देवाने राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत शाह यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडी दोनच्या कार्यकाळात २०१० साली २५ दहशतवाद्यांची मुक्तता करण्यात आली त्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी देशाला सांगावे. सुटका केलेल्या दहशतवाद्यांपैकी शाहीद लतीफ हा दहशतदी पठाणकोट हल्ल्यात सहभागी होता असा दावा अमित शाह यांनी केला. राहुल गांधी कंदहार विमान अपहरणाला राजकीय मुद्दा बनवणार असतील तर रुबिया सईदसाठी १० दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली त्याबद्दलही बोलावे. रुबिया सईद तत्कालिन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या आहेत.