भारताबरोबरचे संरक्षण संबंध वाढवण्याचे विधेयक अमेरिकेच्या संसदेत मंजूर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/usa-.jpg)
वॉशिंग्टन – भारताबरोबरचे संरक्षण संबंध वाढवण्यासाठी अमेरिकेच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात सादर करण्यात आलेले विधेयक मंजूर करण्यात आले आहे. सुमारे 716 अब्ज डॉलरच्या या संरक्षण विधेयकामुळे भारत हा अमेरिकेचा प्रमुख संरक्षण भागीदार बनणार आहे. अमेरिकेने 2016 साली भारताला प्रमुख संरक्षण भागीदार बनवले आहे. त्यामुळे भारताला अमेरिकेच्या निकटच्या देशांपेक्षाही जास्त अत्याधिनिक आणि संवेदनशील तंत्रज्ञान खरेदी करणे शक्य झाले आहे. भविष्यातही दोन्ही देशांमधील संरक्षण भागीदारी यामुळे निश्चित झाली आहे.
अमेरिकेच्या संसदेमध्ये मांडले गेलेले हे विधेयक 85 विरुद्ध 10 मतांनी मंजूर झाले. अमेरिकेच्या सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीचे अध्यक्ष जॉन मॅक्गेन हे गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने आजारी आहेत. त्यांच्या सन्मानार्थ “द नॅशनल डिफेन्स ऍथोरायजेशन ऍक्ट 2019′ हे नाव विधेयकाला देण्यात आले आहे.
या संरक्षण विधेयकामध्ये अफगाणिस्तानातील सुरक्षेसाठी 5.2 अब्ज, अमेरिकेने केलेल्या कारवाईच्यावेळी अन्य देशांनी केलेल्या सहकार्याचा मोबदला म्हणून 350 दशलक्ष डॉलर आणि सिरीयाविरोधातील कारवाईसाठी सैन्याचे प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रसिद्धतेसाठी 300 दशलक्ष डॉलरची तरतूद आहे.