भाजपाच्या कैलाश विजयवर्गीयांकडून काँग्रेसचे कौतुक, पराभव स्विकारला?
मध्य प्रदेश, छत्तीसगडसहित पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालादरम्यान सध्याचे कल पाहता काँग्रेसने भाजपाला मात दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपाचे कैलाश विजयवर्गीय यांनी काँग्रेसचे कौतुक केले आहे.
विजयवर्गीय एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले, काँग्रेसने चांगली तयारी केली तसेच एकत्र येऊन निवडणुका लढवल्या. मात्र, अद्याप पूर्ण चित्र स्पष्ट झालेले नसल्याने मध्य प्रदेशात भाजपाच सरकार स्थापन करेल असेही त्यांनी म्हटले आहे.
मात्र, विजयवर्गीय यांनी ज्या अर्थी काँग्रेसच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यावरुन त्यांनाही भाजपाचा पराभव दिसत असून आपला पराभव त्यांनी मान्य केला आहे. सध्या जे कल येत आहेत त्यानुसार, मध्य प्रदेशातात काँग्रेसने भाजपाला मागे टाकले असून भाजपा ९६ जागांवर तर काँग्रेस ११८ जागांवर आघाडीवर आहे. तर छत्तीसगडमध्ये काँग्रेस ५७ तर भाजपा २६ जागांवर आघाडीवर आहे. या दोन्ही राज्यात गेल्या ३ वेळेपासून भाजपाचे सरकार आहे.
दरम्यान, अद्याप मतमोजणी सुरु आहे. त्यामुळे काही वेळातच निकाल स्पष्ट होतील. त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानात कोणाचे सरकार येईल हे स्पष्ट होईल.