Breaking-newsराष्ट्रिय
भाजपाच्या अडचणी वाढल्या ; उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत विरोधक एकत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/BJP-1-6.jpg)
लखनऊः कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यातील विरोधकांची एकी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या चिंता वाढवणारी असल्याचे बोलले जात आहे. अशातच, उत्तर प्रदेशातील आणखी एका पोटनिवडणुकीत विरोधक एकत्र आल्याने भाजपाच्या अडचणी वाढल्याचे चित्र आहे.
कैराना लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या कंवर हसन यांनी राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सूम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भावोजी-वहिनींच्या या युतीमुळे भाजपाचे गणित विस्कटले आहे. कारण, काँग्रेस, बसपा, सपाने त्यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा महाआघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार आहे.
भाजपाचे खासदार हुकूम सिंह यांचे फेब्रुवारी महिन्यात निधन झाले. त्यानंतर, कैराना लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी २८ मे रोजी मतदान होणार असून ३१ मे रोजी मतमोजणी आहे. भाजपाने हुकूम सिंह यांची कन्या मृगांका सिंह हिला उमेदवारी दिली आहे.
सहानुभूतीच्या लाटेचा तिला फायदा होईल, असा सरळ-साधा विचार भाजपाने केला होता. राष्ट्रीय लोक दलाने तबस्सूम यांना तिकीट देताच, सर्व भाजपाविरोधक त्यांच्या बाजूने उभे राहिले होते. परंतु, त्यांचे तबस्सूम यांचे भावोजी कंवर हसन अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने भाजपाला मोठा आधार मिळाला होता. मुस्लिम मतांचे विभाजन त्यांच्या पथ्यावर पडले असते. परंतु, आता कंवर हसन राष्ट्रीय लोक दलासोबत जाणार असल्याने ही निवडणूक भाजपासाठी कठीण झाली आहे.