भाजपने काँग्रेसला जिवंत ठेवले आहे – शिवसेना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/uddhav-thackeray.jpg)
मुंबई : कर्नाटकमध्ये दोनच दिवसांपूर्वी बोगस मतदार ओळखपत्रे सापडली होती. यावरून शिवसेनेने भाजपला सामना संपादकीयमधून चांगलेच सुनावले आहे. आता ‘शाई’चे राज्य संपले, पण भाजप ‘ईव्हीएम’ मशीनचा घोटाळा करून निवडणुका जिंकत आहे. त्यात आता बोगस‘व्होटर्स कार्ड’ची भर पडली. म्हणजे खुर्चीवर बसलेल्यांचे फक्त मुखवटे बदलले, चेहरे तेच आहेत. भाजपने काँग्रेसचा पराभव केला नाही, तर काँग्रेसला स्वतःमध्ये विलीन करून घेतले आणि विजय मिळविले. भाजपने काँग्रेसला जिवंत ठेवले आहे ते असे. ‘काँगेसमुक्त भारता’साठी भाजपने केलेल्या या त्यागाचे मोल अनमोल आहे. त्यासाठी भाजपची पाठ थोपटावीच लागेल!
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. बंगळुरुत बोगस मतदार ओळखपत्र सापडल्याच्या पार्श्वभूमीवर ही टीका करण्यात आली आहे. बंगळुरुत १० हजार बोगस मतदार ओळखपत्र सापडले असून या व्होटर फर्जीवाडावरुन निवडणुकीची खाली घसरलेली पातळी दिसते. पैशांचा वारेमाप वापर सुरु असून भाजपाकडे इतका पैसा कुठून येतो, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.