भाजपच्या कर्नाटकातील जाहीरनाम्यात कर्जमाफी, मंगळसूत्र, स्मार्ट फोनचे आश्वासन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/BJP.jpg)
बंगळुरू – भारतीय जनता पक्षाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आज प्रकाशित केला. त्यात त्यांनी शेतकऱ्यांची एक लाख रूपयांपर्यंतची कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले असून राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांसाठी दीड लाख कोटी रूपयांची तरतूद करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. तसेच दारिद्य्र रेषेखालील नवविवाहित तरूणींना लग्नात तीन ग्रॅमचे मंगळसूत्र आणि 25 हजार रूपयांची रक्कम देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर कॉंग्रेसच्या काळातील आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका प्रकाशित करू असेही भाजपने म्हटले आहे.
भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुप्पा आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. राज्यातील गायींच्या रक्षणासाठी गोसेवा आयोग स्थापन केला जाईल असेही भाजपने म्हटले आहे. राज्यातील तीन लाख लोकांशी चर्चा करून आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून तो पक्षाचे कर्नाटक विषयीची व्हीजन डॉक्युमेंट आहे असेही त्यांनी म्हटले आहे. दारिद्र रेषेखालील महिलांना स्मार्ट फोन देण्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यात आहे.