ब्राझीलमध्ये बँकेवर दरोडा, पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक; 12 जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Brazil-Bank-Robbery.jpg)
ब्राझीलमध्ये पोलीस आणि बँक चोरांमध्ये झालेल्या चकमकीत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उत्तरपूर्व ब्राझील येथील एका शहरात ही चमकक उडाली होती अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी पाच जणांना ओलीस ठेवलं होतं. यामध्ये दोन लहान मुलं होती. या सर्वांचा चकमकीत मृत्यू झाला.
चोर दोन बँकांचे एटीएम चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलीस आणि चोरांमध्ये चकमक उडाली. ‘आमच्या प्राथमिक तपासात सहा पोलिसांसह 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे’, असं राज्यपालांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.
ज्या पाच जणांना ओलीस ठेवण्यात आलं होतं, ते सर्वजण एकाच कुटुंबातील होते अशी माहिती मिळत आहे. त्यांची कार हायवेवरुन हायजॅक करण्यात आली होती. बंदुकीचा धाक दाखवत चोरांनी त्यांना शहरातून नेलं होतं. हे एका स्थानिक व्यवसायिकाचं कुटुंब होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
चोरी करण्याचा प्रयत्न अपयशी झाल्याने चोरांनी दोन वेगवेगळ्या गाड्यांमधून पळ काढला. एका चोराचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडलेल्या गाडीत सापडला असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तवाहिनीने दिलं आहे. पोलीस हेलिकॉप्टरच्या सहाय्याने चोरांचा शोध घेत होते अशी माहिती आयुक्तांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.