बुलंदशहर हिंसाचार: ‘साहेबांना वाचवण्यासाठी गेलो तर जमावाने माझ्यावरच हल्ला केला’

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या हिंसाचारात पोलीस उपनिरीक्षक सुबोध सिंह यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी साक्षीदार असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ते जखमी अवस्थेत असणाऱ्या सुबोध सिंह यांना घेऊन जात होते, तेव्हा जमावाने अचानक त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यानंतर साक्षीदार असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथून कसाबसा पळ काढत आपला जीव वाचवला, मात्र सुबोध सिंह यांना आपले प्राण गमवावे लागले.
साक्षीदार पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘सर जखमी अवस्थेत पडले होते. मी त्यांना गाडीत ठेवलं आणि घेऊन जाणार इतक्यात तिथे जमाव आला. चारही बाजूंनी आवाज येत होता की त्यांना पकडा आणि मारा. जेव्हा सगळे धावायला लागले तेव्हा मीदेखील आपला जीव वाचवण्यासाठी उडी घेतली आणि पळ काढला. गोळीबारही सुरु होता मात्र सुदैवाने आमच्यापर्यंत पोहोचला नाही’.
एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) आनंद कुमार यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्यावर कशाने वार करण्यात आले यासंबंधी अद्याप ठोस माहिती हाती आली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच स्थानिक निवासी सुमित यांच्यावर कोणी गोळी चालवली याचीही माहिती अद्याप मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यादरम्यान पोलीस निरीक्षक सुबोध यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
कथित गोहत्येच्या संशयावरुन हा हिंसाचार सुरु झाला होता. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अवैध कत्तलखान्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांनी येथील पोलीस स्टेशनला पेटवून दिले. तसेच मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. त्यानंतर एका पोलीस व्हॅनला आग लावण्यात आली.
माध्यमांतील वृत्तानुसार, स्यानामधील एका गावातील शेतामध्ये गोमांस आढळून आल्याने त्याविरोधात लोकांनी आंदोलन पुकारले. दरम्यान, पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी गोळी चालवली. यामध्ये एक तरुण गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर अनियंत्रित जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईत जखमी झालेल्या एका तरुणाचा मेरठमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला.





