बालाकोटची कारवाई निर्लष्करी असल्याने मृतांचा आकडा दिला नाही- सीतारामन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Untitled-7-10.jpg)
बालाकोट येथे भारताने केलेला हवाई हल्ला ही लष्करी कारवाई नव्हती तर ती निर्लष्करी कारवाई होती. पाकिस्तानात गेल्या आठवडय़ात भारतीय हवाई दलाकडून जैश ए महंमदच्या छावणीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात नागरिकांची कुठलीही हानी झालेली नाही, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी हवाई हल्ल्यातील नुकसानीचा आकडा दिला नाही, किती दहशतवादी मारले गेले हे सांगितले नाही. त्यांनी केवळ सरकारची भूमिका मांडली, कारण ती निर्लष्करी कारवाई होती असे त्या म्हणाल्या.
गोखले यांनी गेल्या मंगळवारी पाकिस्तानातील जैश ए महंमदच्या बालाकोट येथील छावणीवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेत असे सांगितले होते, की या कारवाईत मोठय़ा प्रमाणावर दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक व कमांडर्स ठार झाले आहेत.
भारताने पाकिस्तानात जैश ए महंमदच्या दहशतवादी छावणीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले याची संख्या जाहीर करावी असा धोशा विरोधी पक्षांनी लावला असून, त्या पाश्र्वभूमीवर सीतारामन यांनी वरील स्पष्टीकरण केले. आगामी लोकसभा निवडणुका पाहून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
गेल्या १४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान मारले गेले होते. मंगळवारी भारताने बालाकोट येथे हवाई हल्ले केले. त्यानंतर सुरुवातीला हवाई दलाच्या कारवाईचे स्वागत करणाऱ्या विरोधी पक्षांनी या कारवाईत किती दहशतवादी मारले गेले या बाबत विचारणा सुरू केली व ही माहिती मिळणे हा लोकांचा हक्कच असल्याचा दावा केला होता.