बगदादी विरोधातील अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसच्या कारवाईचा VIDEO प्रसिद्ध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/bakar-residance.jpg)
इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बाकर अल बगदादी विरोधात अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसनी केलेल्या कारवाईचा व्हिडीओ आणि फोटो पेंटागॉनने प्रसिद्ध केले आहेत. उत्तरपश्चिम सीरियामध्ये बगदादीच्या घराभोवती उंच भिंतीचे कंम्पाऊंड होते. अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसचे कमांडो त्या भिंतीच्या दिशेने जात असल्याचे ब्लॅक अँड व्हाइट फुटेज पेंटागॉनने जारी केले आहे.
बगदादीच्या घराजवळ हे कमांडो विशेष हेलिकॉप्टरने पोहोचले. त्यावेळी जमिनीवरुन काही दहशतवाद्यांनी हेलिकॉप्टरच्या दिशेने गोळीबार केला. त्यावेळी त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्यात आला. त्याचा व्हिडीओ सुद्धा पेंटगॉनने प्रसिद्ध केलाय. हल्ला होण्याआधी आणि नंतर ते कंम्पाऊड कसे दिसते ते फोटोमधून दाखवण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईत तीन मुलांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. पण तीन नव्हे तर दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे पेंटागॉनने सांगितले आहे. बगदादीचा एका भुयारामध्ये खात्मा झाला. पळण्यासाठी मार्ग उरला नाही त्यावेळी त्याने स्फोटामध्ये स्वत:ला उडवून घेतले. लपण्यासाठी म्हणून त्याने या भुयाराची निर्मिती केली होती. अमेरिकेच्या या कारवाईत बगदादीसह दोन मुले, चार महिला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अमेरिकन हेलिकॉप्टरवर गोळीबार करणारे बगदादीचे अनेक साथीदारही मारले गेले.
या कारवाईनंतर ट्रम्प यांनी अमेरिकी लष्कराच्या एका प्रशिक्षित श्वानाचा फोटो शेअर केला असून, “बगदादीला शोधण्यात आणि ठार मारण्यात याने महत्त्वाची भूमिका निभावली” असं म्हणत त्या श्वानाचं कौतुक केलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र या श्वानाचं कौतुक होत आहे. बेल्जिअन मालिनोस जातीच्या या कुत्र्याचं नाव मात्र ट्रम्प यांनी जाहीर केलेलं नाही. अमेरिकेने लादेनचा खात्मा केल्यानंतर बेल्जिअन मालिनोस जातीच्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. लादेनचा शोध घेण्यात या श्वानांची मोठी मदत झाल्याचं सांगितलं जातं.