‘फेसबुक मैत्री’च्या माध्यमातून शिक्षिकेला तब्बल २१ लाखांचा गंडा!
![Money fraud incident took place in Bhosari and Pimple Nilakh by ATM clonning in Hotels](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/cyber-crime-Frame-copy-2-1.jpg)
नगर | महाईन्यूज
फेसबुकच्या माध्यमातून मैत्री जमवलेल्या जामखेडमधील शिक्षिकेला तब्बल २१ लाख रुपयांना गंडा घातला गेला. फेसबुक व मोबाइल चॅटिंगच्या सापळ्यात या शिक्षिकेला अडकवण्यात आले. काहीसा ‘नायजेरिअन फ्रॉड’सारखाच हा प्रकार आहे. याबाबत जिल्हा पोलीस दलाच्या सायबर क्राईम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र फसवणूक झाल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी या शिक्षिकेने तक्रार देण्याचे धाडस दाखवले. जिल्ह्य़ात ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणूक होण्याचे गुन्हे वाढलेले आहेत.फसवणूक झालेली ही जामखेडमधील माध्यमिक शिक्षिका विविध पुरस्कारप्राप्त आहे.
इंग्लंडमधून बोलत असल्याचे सांगत व डॉक्टर असल्याचा बहाणा करत डॉ. मार्क हॅरील्युके याने शिक्षिकेशी जून २०१९ पासून फेसबुकच्या माध्यमातून मैत्री जमवण्यास सुरुवात केली. प्रारंभी शिक्षिकेने फारसा प्रतिसाद दिला नाही. मात्र नंतर त्याच्या गोड बोलण्याला प्रतिसाद दिला. नंतर त्याने शिक्षिकेशी गप्पा मारत त्याने एकदा मोबाइल क्रमांक मिळवला. मोबाइवर चॅटिंग करतानाही तो अतिशय सभ्य व कौटुंबिक भाषा वापरत होता. त्यामुळे शिक्षिकेचा विश्वास बसला. माझी मुलेही तुमच्या मुलांएवढीच आहेत, असे सांगत डॉ. मार्क याने शिक्षिकेच्या मुलांना लॅपटॉप व मोबाइल गिफ्ट म्हणून पाठवल्याचा निरोप दिला होता. नंतर एके दिवशी शिक्षिकेला मुंबईतून कस्टम अधिकारी असल्याचे सांगत एका महिलेने शिक्षिकेशी संपर्क साधला. महिलेने शिक्षिकेला तुम्हाला पाठवलेल्या गिफ्टमध्ये ५० हजार पौंड स्कॅन झाल्याचे सांगत त्याचा चार्ज भरा नाहीतर गुन्हा दाखल होईल असे धमकावले. त्यामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने नातलग, ओळखीचे अशांकडून सुमारे २१ लाख ४१ हजार २७५ रुपयांची रक्कम ११ जून ते जुलै २०१९ या कालावधीत वेळोवेळी ७ बँकांच्या खात्यावर जमा केली. ही बँक खाती दिल्ली, मणीपूर, मिझोराम या राज्यातील आहेत. नंतर नायजेरिअन फ्रॉडच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्यांतर शिक्षिकेने सायबर क्राईम पोलिसांशी संपर्क साधला.