फेसबुकची आता ई-कॉमर्स वेबसाईट;अमेझॉनशी थेट स्पर्धा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/facebook-.jpg)
नवी दिल्ली : प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आता ई-कॉमर्स मार्केटमध्येही एन्ट्री करण्याचे ठरवले आहे. या क्षेत्रात फेसबुकची थेट स्पर्धा वॉलमार्ट आणि अमेझॉनशी असणार आहे. ई-कॉमर्सवरील आपला व्यावसाय वाढवण्यासाठी फेसबुकने काही नामांकित ब्रँड्ससोबत चर्चा करण्यासही सुरुवात केली आहे. येत्या जून महिन्याच्या सुरुवातीलच फेसबुक भारतात आपली ई-कॉमर्स वेबसाईट लॉन्च करणार आहे. सध्या या वेबसाईटचे टेस्टिंग सुरु असल्याची माहिती मिळते आहे.
फेसबुक आपल्या ई-कॉमर्स वेबसाईट नवीन टूल्स विकसित करणार असून, कुठल्याही कंपनीला प्रॉडक्ट्स अपलोड करणे आणि स्टॉक मॅनेज करणे शक्य होईल, अशा पद्धतीचे वेबसाईटचे स्वरुप असेल. तसेच, वर्षअखेरपर्यंत फेसबुक पेमेंट सिस्टमसुद्धा सुरु करणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात फेसबुकने पहिल्यांदा मार्केटप्लेस भारतात लॉन्च केले. त्यानंतर फेसबुक सातत्याने मार्केटप्लेसला विकसित केले जात आहे. आता याच माध्यमातून ग्राहकांना ई-कॉमर्सला जोडण्याचा प्रयत्न फेसबुकने सुरु केला आहे.
फेसबुकच्या मार्केटप्लेसची संकल्पना ‘ग्राहक ते ग्राहक’ या स्वरुपाची होती. ओएलएक्स किंवा क्विकरसारख्या आधीपासूनच या स्वरुपाच्या वेबसाईट्सना फेसबुकने स्पर्धा निर्माण केली होती. मात्र मार्केटप्लेस फीचर फार लोकप्रिय ठरले नाही. त्यामुळे आता मार्केटप्लेसला पूर्णपणे ई-कॉमर्स वेबसाईटमध्ये बदलले जाईल.