breaking-newsराष्ट्रिय
प्रवीण तोगडिया यांना सभा घेण्यासाठी बंदी
गुवाहाटी: गुवाहाटी पोलिसांनी आज विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांच्यावर गुवाहाटी येथे सभा घेण्यास दोन महिन्यांची बंदी घातली आहे. तोगडिया यांच्या ‘प्रक्षोभक’ भाषणांमुळे राज्यातील शांततेला बाधा पोहचू शकते असे कारण देत पोलिसांनी त्यांच्यावर बंदी घातली आहे. तसेच त्यांना जर कोणत्याही समाज माध्यमामधून लोकांशी संवाद साधायचा असेल तरी देखील त्यांना पोलिसांची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे.
पोलीस आयुक्त हिरेन चंद्र नाथ यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की तोगडिया हे आजपासून गुवाहाटी दौऱ्यावर असून १९ तारखेपर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांच्या शृंखलेत तोगडिया शहरातील विविध भागांमध्ये सभा घेणार होते. नव्याने स्थापन झालेल्या आंतरराष्टीय हिंदू परिषदेने हे कार्यक्रम आयोजित केले होते, मात्र तोगडिया यांची मागील काळातील भाषणे लक्षात घेता त्यांची भाषणे प्रक्षोभक असून शांतता भंग करणारी आहेत. शहरात जर तोगडिया यांनी अशी भाषणे केली तर शहरातील अल्पसंख्यांक समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने तोगडिया यांच्यावर बंदी घालण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.