प्रफुल्ल पटेलांना ईडीची नोटीस, ‘मिर्ची’ प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Prafull-Patel.jpg)
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलं आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्चीसोबत करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहार प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीने २१ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानाआधीच १८ ऑक्टोबरला प्रफुल्ल पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत आपले इक्बाल मिर्चीसोबत कोणतेही संबंध नसल्याचा दावा केला आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इक्बाल मिर्चीसोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याचा प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. पटेल यांच्या कुटुंबाने प्रमोट केलेली कंपनी आणि मिर्ची या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इकबाल मेमन यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे.प्रफुल्ल पटेल यांनी आपलं कुटुंब आणि इक्बाल मेमनदरम्यान झालेल्या आर्थिक व्यवहारासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या व्यवहारावरुन आरोप करण्यात येत आहेत, तो व्यवहार पूर्णपणे कायदेशीर होता असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. जमिनीचा इतिहास सांगताना प्रफुल्ल पटेल यांनी कशाप्रकारे ही वादग्रस्त जमीन १९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली एम के मोहम्मद नावाच्या व्यक्तीकडून इक्बाल याला विकण्यात आली असल्याचं सांगितलं.