पुरामुळे देशभरात 1276 मृत्यू, 70 लाखाहून अधिक लोक प्रभावित – गृह मंत्रालय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/haialakandi-flood.jpg)
नवी दिल्ली – या मान्सूनमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे देशभरात 1276 मृत्यू झाले आहेत. 70 लाखाहून अधिक लोक प्रभावित झाले असून 5 राज्यांतील 17 लाख लोक शरणार्थी शिबिरांत राहत आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.
केरळमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरांमुळे प्रचंड प्रंमाणावर हानी झाली असून 443 लोक मृत्युमुखी पडले आहेत. 14 जिल्ह्यांतील 54.11 लाख लोक प्रभावित झाले आहेत. 47,727 हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत. इतर चार राज्यांत अतिवृष्टी आणि पुरांमुळे सुमारे 850 लोक मरण पावले आहेत. केरळप्रमाणेच, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि आसाम या राज्यांत पुरांमुळे हाहाकार माजला आहे. गृह मंत्रालयाच्या आपत्ती निवारण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टी आणि पुरामुळे उत्तर प्रदेशात 218 पश्चिम बंगालमध्ये 198, कर्नाटकात 166, महाराष्ट्रात 139, गुजरातमध्ये 52, आसाममध्ये 49 आणि नागालॅंडमध्ये 11 लोक मरण पावले आहेत.
उत्तर प्रदेशात 18 जिल्ह्यातील 2.92 लाख लोक, पश्चिम बंगालमध्ये 23 जिल्ह्यातील 2.27 लाख लोक, कर्नाटकात 11 जिल्ह्यातील 3.5 लाख लोक, आसाममध्ये 23जिल्ह्यातील 11.47 लाख लोक पुराने प्रभावित झाले आहेत. महाराष्ट्रात 26 जिल्हे आणि गुजरातमध्ये 10 जिल्हे पुराने प्रभावित झाले आहेत.
सन 2005 पर्यंत दर वर्षी पुरांमुळे सरासरी 1600 लोक मरण पावत होते. शेती, घरे आणि सार्वजनिक संपत्तीचे दरवर्षी सरासरी 4,745कोटी रुपयांचे नुकसान होत होते. देशातील 12 टक्क्यांपेक्षा अधिक प्रदेश पूरग्रस्त होत होता अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाने दिली आहे.
गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी, म्हणजे सन 2017 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे 1200 पेक्षा अधिक लोक मरण पावले होते, त्यात सर्वात जास्त 514 बिहारमध्ये, पश्चिम बंगालमध्ये 261, आसाममध्ये 160, महाराष्ट्रात 124 आणि उत्तर प्रदेशात 121 लोक मरण पावले होते.