पाकिस्तानमध्ये तृतीयपंथी निवडणूक लढवणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/pak-flag-6.jpg)
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच तृतीयपंथी उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. एकूण १३ तृतीयपंथी याची तयारी करत असून, त्यापैकी दोन संसदेची तर इतर प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका लढविणार आहेत.
तृतीयपंथींना निवडणूक लढविणे सुलभ व्हावे यासाठी ‘पाकिस्तान ट्रान्सजेंडर इलेक्शन नेटवर्क’ नावाची स्वयंसेवी संस्थाही स्थापन केली आहे. ही संस्था व निवडणूक आयोगाने यावर सांगोपांग चर्चा केली. पाकिस्तानात यंदा आॅगस्टमध्ये जनगणनेत प्रथमच तृतीयपंथींची स्वतंत्रपणे नोंद झाली. त्यानुसार पाकिस्तानच्या एकूण २० कोटी ८० लाख लोकसंख्येत १०,४१८ तृतीयपंथी व्यक्ती आहेत.
गेल्या निवडणुकीत चार तृतीयपंथींनी उमेदवारी अर्ज भरले होते. परंतु अनुभव व साधनांअभावी त्यांना नीट प्रचार करता आला नव्हता. आता ट्रान्सजेंटर नेटवर्क त्यांना संघटितपणे निवडणूक लढविण्यास मार्गदर्शन व मदत करणार आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाने २५ ते २७ जुलै दरम्यान देशात सार्वत्रिक निवडणूक घेण्याचा प्रस्ताव केला आहे. मतदानाची नक्की तारीख नंतर ठरेल.