पाँडेचेरीत नायब राज्यपाल किरण बेदींविरोधात निदर्शन, राज निवासच्या बाहेर झोपले मुख्यमंत्री
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे पाँडेचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी यांनीदेखील नायब राज्यपालांविरोधात बंड पुकारलं आहे. नायब राज्यपाल किरण बेदी यांच्याविरोधात निदर्शन करत मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. नायब राज्यपाल किरण बेदी जाणुनबुजून राज्य सरकारविरोधात निर्णय घेत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
इतकंच नाही तर मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री आणि आमदारांसोबत किरण बेदींच्या निवासस्थानाबाहेर झोपले होते. किरण बेदी जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या कामात अडथळा आणत असून विकास योजनांमध्ये दखल देत असल्याचा आरोप मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी यांनी केला आहे. यासाठीच हे प्रदर्शन करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले की, ‘किरण बेदी यांनी आमच्या मोफत तांदूळ योजनेला विरोध करत फाइल परत केली आहे. त्या कोण आहेत? जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या योजना आणि धोरणं त्या रोखू शकत नाहीत’.
दुसरीकडे किरण बेदी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून २१ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता चर्चेसाठी बोलावलं आहे. आपल्या पत्राची वाट न पाहता मुख्यमंत्र्यांनी निवासस्थानाबाहेर येऊन निदर्शन करण्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला ही गोष्ट शोभणारी नाही असंही किरण बेदी यांनी म्हटलं आहे.