पत्नीच्या अंत्यसंस्कारावेळी पतीची बेदम मारहाण करुन हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/murder-1.jpg)
कर्नाटकातील विजयपूर येथे एका मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या पतीची बेदम मारहाण करत हत्या केली. ही घटना महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी घडली. या महिलेने पतीच्या जाचामुळेच आत्महत्या केल्याचा तिच्या नातेवाईकांचा आरोप होता.
विजयपूरमधील किलारहट्टी गावातील रहिवासी राजू शकवाजी तांबेची पत्नी काजल तांबेने रविवारी सिंधुदुर्ग येथे स्वत:ला जाळून घेतले होते. काजलने आत्महत्येचे पाऊल का उचलले हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु, तिच्या नातेवाईकांनी पती राजूमुळेच आत्महत्या केल्याचा आरोप केला.
राजू आणि काजल यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. नोकरीच्या शोधात दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले होते. दोघांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाला होता. घरातील काही वयस्कर लोकांनी अनेकवेळा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, दोघांच्या नातेसंबंधात फरक पडला नव्हता.
अखेर रविवारी काजलने आत्महत्या केली. अंत्यसंस्कारासाठी काजलचा मृतदेह तिच्या नातेवाईकांनी घरी आणला होता. नातेवाईकांनी राजूवर आत्महत्येस प्रवृत्त केलयाचा आरोप करत अंत्यसंस्कारावेळीच राजूला बेदम मारहाण केली. यात राजूचा मृत्यू झाला. यावेळी राजूचा भाऊ संजय हाही जखमी झाला. पोलिसांनी राजूचे वडील शिवाजी गंगाराम तांबे यांच्या तक्रार नोंद करुन घेतली आहे.