‘नोटांबदी-जीएसटी’ हेच गुजरातमधील उत्तर भारतीयांवरील हल्ल्याचे कारण : राहुल गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/rahul-gandhi-6.jpg)
नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्याबदल मंगळवारी केंद्र आणि गुजरात सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी दावा केला की, गुजरात राज्यात बंद पडलेले कारखाने आणि बेरोजगारी यामुळेच गुजरातमधील हिंसाचार वाढत आहे.
राहुल गांधी यांनी याबदल फेसबुक पोस्ट केली अाहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘गुजरातमधील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांना सरकारची चुकीची धोरणं जबाबदार आहे. गुजरातमध्ये चुकीचे आर्थिक धोरणं, नोटाबंदी आणि जीएसटी योग्यप्रकारे लागू न केल्याने तेथील उद्योग उध्दवस्त झाले आहेत. गुजरात राज्यातील हिंसाचाराचं मूळ कारण तेथील बंद पडलेले कारखाने आणि त्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी आहे. व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्ही कोलमडली आहे’.
पुढे ते म्हणाले की, ‘प्रवासी कामगार हे आपल्या आर्थिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण आहेत. कामगारांना निशाणा करण चुकीचं आहे.मी पूर्णपणे यांच्या विरोधात आहे’. ‘सरकारने परप्रांतीय लोकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलावीत व त्यांना सुरक्षा देण्याचा पूर्ण प्रयत्न करावा’, असेही त्यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण..
गुजरात मध्ये गेल्या आठवड्यात एका चौदा वर्षीय मुलीवर बिहार मधील एका मजुराने बलात्कार केल्याची घटना उघडकीला आल्यानंतर तेथे उत्तरप्रदेश आणि बिहार मधून आलेल्या मजुरांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मजुरांनी त्या राज्यांतून मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू केले आहे.