निवृत्त न्यायाधीश नसीर उल मुल्क पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/nasir-ul-mulk-.jpg)
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवृत्त न्यायाधीश नसीर उल मुल्क कार्यभार सांभाळणार आहेत. काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावावर एकमत झाले आहे.
पाकिस्तानच्या सध्याच्या सरकारचा कार्यकाल 31 मे 2018 रोजी पूर्ण होत आहे. परंतु नवीन लोकसभेसाठी मतदान होणार आहे 25 जुलै रोजी. त्यामुळे सध्याच्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे 1 जून 2018 पासून ते नवीन सरकारची स्थापना होईपर्यंतच्या काळासाठी निवृत्त न्यायाधीश नसीर उल मुल्क यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकार कामकाज सांभाऴील.
पाकिस्तानात एक लोकसभा भंग पावल्यापासून ते नवीन सरकार स्थापन होईपर्यंतचा काळासाठी सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने काळजीवाहू सरकारची स्थापन केली जाते. यावेळी मात्र काळजीवाहू पंतप्रधानाच्या नावावर एकमत होत नव्हते. पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी आणि विरोधी पक्षनेते खुर्शीद शाह यांच्यातील सहा आठवड्यांच्या चर्चेनंतरही काही तोडगा निघू शकला नव्हता. अखेर माजी न्यायाधीश नसीर उल मुल्क यांच्या नावावर सहमती झाली. न्यायमूर्ती नसीर उल मुल्क यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून 13 महिने जबाबदारी पार पाडली आहे.