निर्भया हत्याकांडातील आरोपींची फाशी कायम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/supreme-court-copy-1.jpg)
नवी दिल्ली: देशाला हादरवणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील तिन्ही आरोपींना माफी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. या तिन्ही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे या आरोपींना राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी पवन, विनय आणि मुकेश या तीन आरोपींच्या पुनर्विचार याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. चौथा आरोपी अक्षयने पुनर्विचार याचिका सादर केली नव्हती. आजच्या सुनावणीवेळी निर्भयाचे कुटुंबीयही कोर्टात उपस्थित होते. या याचिकेवर पुनर्विचार करण्यासाठी कोणतीच पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्यावर पुनर्विचार करता येणार नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने या तिघांची याचिका फेटाळून लावली आहे. या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी निर्भयाच्या कुटुंबीयांनी केली होती.