नवे सरन्यायाधीश म्हणून रंजन गोगोई यांची शिफारस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/ranjan-gogoi-.jpg)
नवी दिल्ली – सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत आज त्यांचे उत्तराधिकारी बनण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्या.रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस केली. यासंबंधीचे मिश्रा यांचे पत्र केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाकडे पाठवण्यात आले. आता या शिफारसीवर केंद्र सरकारचे शिक्कामोर्तब होणे ही बाब केवळ औपचारिकता मानली जात आहे.
मिश्रा 2 ऑक्टोबरला सेवानिवृत्त होणार आहेत. त्याच्या पुढच्याच दिवशी गोगोई नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. सुमारे आठ महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी मिश्रा यांच्याविरोधात एकप्रकारे बंडाचे निशाण फडकावले. त्या न्यायाधीशांमध्ये गोगोई यांचाही समावेश होता. त्यामुळे मिश्रा त्यांचे उत्तराधिकारी म्हणून कुणाच्या नावाची शिफारस करणार याबाबत मोठी उत्सुकता होती. प्रथेनुसार सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत वरिष्ठ न्यायाधीशाला सरन्यायाधीश बनण्याचा मान मिळतो. त्या प्रथेला अनुसरून मतभेद असतानाही मिश्रा यांनी गोगोई यांच्या नावाची शिफारस केली. गोगोई यांना सरन्यायाधीश म्हणून वर्षभराचा कार्यकाळ लाभेल. ते पुढील वर्षी 17 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होतील.