दुबई पोलीसांनी दुबईत चोरी झालेला हिरा शोधला श्रीलंकेत
दुबई – दुबई पोलीसांनी दुबईत चोरी झालेल्या एका अतिमौल्यवान हिऱ्याचा शोध श्रीलंकेत लावला आहे. दुबई पोलीसांनीच ही माहिती दिली आहे. दुबईतील एका कंपनीच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्टमधून दोन कोटी डॉलर्स (सुमारे दीड अब्ज रुपये) किमतीचा हा ब्ल्यू डायमंड 25 मे रोजी चोरीला गेला होता. एका सुरक्षाकर्मीनेच हा हिरा सेफ डिपॉझिट व्हॉल्ट्मधून काढला होता. स्मगलिंग करणाऱ्या एका नातेवाईकामार्फत त्याने तो दुबईबाहेर पाठवला.
शंभरावर लोकांच्या जबान्या घेऊन आणि हजारो तासाच्या सीसीटीव्हीचे फुटेज पाहिल्यानंतर पोलीसांना चोराचा सुगावा लागला. चोराला दुबईतच अटक करण्यात आली. चोर हिऱ्यासंबधी फारशी माहिती देऊ शकला नाही. पण तरीही पोलीसांनी श्रीलंकेत जाऊन हिरा पुन्हा ताब्यात मिळवण्यात यश मिळवले. मात्र श्रीलंकेत जाऊन हिऱ्याचा शोध कसा घेतला याबद्दल काही माहिती देण्यात आलेली नाही.