दहशतवाद्यांवर निर्णायक कारवाई करा – अमेरिकेची इम्रान खान यांना सुचना

वॉशिंग्टन – पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पोम्पेओ यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. पाकिस्तानने आपल्या भूमीवरून कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात निर्णायक कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा पॉम्पेओ यांनी इम्रान खान यांच्याशी बोलताना केली आहे.
अफगाणिस्तानातील तालिबानी गट आणि अन्य दहशतवादी संघटनांना पाकिस्तानी सरकारकडूनच मोठ्या प्रमाणात सहाय्य केले जात असल्याने अमेरिकेने अलिकडेच पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या आर्थिक आणि लष्करी मदतीत मोठी कपात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पॉम्पेओ यांनी केलेल्या सुचनेला विशेष महत्व दिले जात आहे. दोन्ही देशांतील संबंध अधिक फलद्रुप व्हावेत याविषयी अमेरिका इच्छुक आहे असेही पॉम्पेओ यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेत पाकिस्तानने विधायक भूमिका निभावली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केली. दरम्यान अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर त्यांनी जे निवेदन प्रसिद्धीला दिले आहे त्यावर आमच्या सरकारने आक्षेप घेतला आहे अशी माहिती पाकिस्तानी विदेश मंत्रालयाच्या प्रवक्ते महंमद फैसल यांनी सांगितली.
पॉम्पेओ आणि इम्रान खान यांच्यात जे दूरध्वनीवरून संभाषण झाले त्यात दहशतवादाचा एका शब्दानेही उल्लेख आलेला नाहीं. परंतु तरीही अमेरिकेने तसे निवेदन जारी केले आहे त्यात दहशतवादाचा उल्लेख करण्यात आला आहे तो अमेरिकेने मागे घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.





