‘त्या’ बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्यास 5 लाखांचे बक्षीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Untitled-16-3-1.jpg)
आसाममधून ३ जून रोजी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या ए एन ३२ या मालवाहू विमानाचा सर्वतोपरी प्रयत्न करून अजूनही शोध लागलेला नाही. या विमानाची ठोस माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. हवाई दलाकडून हे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. शिलॉंगमध्ये बोलताना संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी याबाबत माहिती दिली. एअर मार्शल आर. डी. माथूर, एओसी इन कमांड, इस्टर्न एअर कमांड यांनी या बेपत्ता विमानाची माहिती सांगणाऱ्याला पाच लाख रुपयांचं इनाम देण्याची घोषणा केली आहे, असं रत्नाकर सिंह म्हणाले.
उड्डाणानंतर काही वेळात भारतीय हवाई दलाचे एएन-३२ हे विमान सोमवारी आसाममध्ये चीनच्या हद्दीलगत बेपत्ता झाले. या विमानात आठ कर्मचारी आणि पाच जवान आहेत. हे विमान आसामातील जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशात जात होते. अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथील तळावर ते दुपारी दीड वाजता पोहोचणे अपेक्षित होते. दुपारी १२.२५ वाजता या विमानाने उड्डाण केले आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांचा त्याच्याशी दुपारी १ वाजता शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर या विमानाचा काहीच पत्ता नसल्याचे हवाई दलाने सांगितले.
या विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने सर्व उपलब्ध यंत्रणा कामाला लावल्या आहेत. ज्या भागात विमान कोसळले असल्याची शक्यता आहे, त्या भागात कमी उंचीवरचे दाट ढग आणि पावसामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत. इस्रोच्या उपग्रहांमार्फत तसेच शोधकार्यातील हेलिकॉप्टर, विमानांवरील सेन्सर्सच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचे पृथ्थकरण सुरू आहे. सुखोई-३० या अद्ययावत विमानाद्वारे तसेच सी-१३० या विशेष शोधक विमानाद्वारे या विमानाचा माग घेतला जात आहे. हे विमान कोसळल्याचाही तर्क असला तरी ते ज्या जागी कोसळल्याची शंका आहे तिथे हवाई दल आणि लष्करामार्फत तसेच स्थानिक प्रशासनामार्फत व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे.
मेचुकाचे वैशिष्टय़
*चीनच्या हद्दीलगत असलेले आणि समुद्रसपाटीपासून १८३० मीटरवर उंचीवर असलेले आणि १९६२च्या युद्धातही मोक्याची अनेक ठिकाणे असल्याने महत्त्वाचे ठरलेले मेचुका हे गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिलेले स्थान आहे. युद्धजन्य परिस्थितीत हवाई दलाची विमाने उतरवण्याचा हवाई तळ म्हणूनही त्याची ओळख आहे. त्याच्या पुनर्बाधणीचा निर्णय २०१३मध्ये घेण्यात आला आणि ३० महिन्यांत अत्यंत वेगाने हे काम तडीस नेण्यात आले.
*मेचुकाप्रमाणेच याच भागात झिरो आणि आलो हे दोन हवाई तळही कार्यरत करण्यात आले आहेत. मेचुकाचा हा तळ इटानगरपासून ५०० किलोमीटरवर आहे आणि चीनच्या हद्दीपासून अवघ्या २९ किलोमीटरवर आहे.