तृणमूलच्या दोन खासदारांना ईडीकडून समन्स
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/trinamool-congre.jpg)
कोलकता – सुदीप बंडोपाध्याय आणि तपस पॉल या तृणमूल कॉंग्रेसच्या दोन खासदारांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. रोझव्हॅली मनी लॉण्डरिंग घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात त्यांना सात दिवसांत ईडीपुढे हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
रोझव्हॅली कंपनीशी कुठल्या प्रकारचे संबंध होते? त्या कंपनीबरोबर आर्थिक व्यवहार झाले आहेत का, आदी प्रश्न दोन्ही खासदारांना विचारले जाणार आहेत. घोटाळ्यासंदर्भात दोन्ही खासदारांना याआधी अटक करण्यात आली होती. जामीनावर त्यांना सोडण्यात आले आहे. बंडोपाध्याय चार महिने तर अभिनेते असणारे पॉल तेरा महिने तुरूंगात होते. शारदा पॉन्झी स्किमप्रमाणेच रोझव्हॅली मनी लॉण्डरिंग घोटाळ्याने पश्चिम बंगालमध्ये राजकीय वादळ निर्माण केले. दोन्ही प्रकरणांत हजारों गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक झाली. सिक्युरीटीज् अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) आदेशावरून रोझव्हॅली प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली.