breaking-newsराष्ट्रिय

… तसं घडल्यास मोदींनी पाकशी चर्चेची संधी सोडू नये – राज ठाकरे

भारतीय वायूसेनेने बुधवारी भारतीय हद्दीत घुसलेली पाकिस्तानची विमाने पिटाळून लावल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला चर्चेचे निमंत्रण दिले आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये, असे आवाहन केले आहे.  पाकिस्तानची खरंच चर्चेची तयारी असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल हे त्यांनीच उचलायला हवं. त्यांनी वैमानिक अभिनंदन यांना तात्काळ सोडलं पाहिजे आणि सीमारेषेवरचा गोळीबार त्वरीत थांबलाच पाहजे. जर या गोष्टी घडल्या तरच म्हणता येईल इम्रान खान यांचे हेतू स्वच्छ आहेत आणि तसं घडलं तर पंतप्रधान मोदींनी ही संधी गमावता कामा नये असे राज ठाकरे यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.

काय म्हटलंय राज ठाकरे यांनी..

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन माझ्या पाहण्यात आलं. अशा प्रकारचं आवाहन त्यांनी पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर देखील केलं होतं. या हल्ल्यात आपण आपले सीआरपीएफचे ४० जवान गमावले होते, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई सेनेने जो हल्ला चढवला तो आवश्यकच होता आणि त्याबद्दल मी भारतीय हवाई दलाचं अभिनंदन देखील केलं होतं.

काल पुन्हा इम्रान खान यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यापासून सर्व मुद्यांवर चर्चेस तयारी दर्शवली आहे. अशा प्रकारे चर्चेतून मार्ग काढण्याची संधी स्व. अटलबिहारी वाजपेयीजी आणि परवेज मुशर्रफ यांच्या काळात आली होती. अटलजींनी सदा-ए-सरहद ही लाहोरपर्यंतची बससेवा सुरू केली. समझौता एक्स्प्रेस सुरू केेली. आग्र्यात ऐतिहासिक चर्चा झाली. पण दुर्दैवाने या चर्च पूणत्वाला जाऊ शकल्या नाहीत.

जी संधी अटलजींच्या काळात दोन्ही देशांच्या हातातून निसटली आहे. ती संधी पुन्हा आपल्यासमोर आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया ही दोन कट्टर शत्रूराष्ट चर्चेतून मार्ग काढण्यासाठी पुढे येऊ शकतात तर आपण का नाही येऊ शकत ?

युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल आणि काश्मिरी जनता देखील भरडली जाईल. हे कोणालाच परवडणारं नाही. अतिरेक्यांना ठेचलेच पाहिजे आणि ते देखील  निष्ठूरपणे, म्हणून युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करुन राजकीय फायदा पण कोणी घेऊ नये. दोन्ही देशांत ज्या समस्या आहेत. त्यावर चर्चेतून मार्ग काढावा आणि दोन्ही देशात शांततेचे वातावरण निर्माण व्हावं हीच इच्छा आहे.

पाकिस्तानची खरंच चर्चेची तयारी असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल हे त्यांनीच उचलायला हवं, ते म्हणजे त्यांच्या कैदेत असलेल्या आमच्या वैमानिकाला, अभिनंदन यांना त्यांनी तात्काळ सोडलं पाहिजे आणि सीमा रेषेवरचा गोळीबार तात्काळ थांबलाच पाहिजे. जर या गोष्टी घडल्या तरच म्हणता येईल की इम्रान खान यांचे हेतू स्वच्छ आहेत. आणि तसं घडलं तर मात्र श्री नरेंद्र मोदींनी देखील ही संधी गमावता कामा नये.

मी पुन्हा एकदा सांगतो की, युद्ध अथवा युद्धजन्य परिस्थिती हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही, आणि त्याचा फायदा करुन घेण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्याही उमद्या राजकारण्याचं लक्षण असू शकत नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button