टोलनाका कर्मचाऱ्याला मारहाण; भाजप खासदाराविरुद्ध गुन्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/bjp_1541573568.jpg)
आग्रा येथे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याशी टोलचे पैसे देण्याच्या मुद्दय़ावर वाद झाल्यानंतर त्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली भाजपचे इटावा येथील खासदार रामशंकर कथेरिया व एका अज्ञात आरोपीविरुद्ध आग्रा पोलिसांनी दंगल, दुखापत करणे यासह शस्त्रविषयक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही चित्रीकरणातील दृश्यात एक व्यक्ती टोल नाक्याच्या कर्मचाऱ्याला थापड मारताना दिसते. त्यानंतर लगेच, खासदारांच्या सुरक्षा ताफ्यातील एक इसम हवेत गोळीबाराच्या दोन फैरी झाडतो. कर्मचाऱ्याला थापड मारणारी व्यक्ती खासदार आहे, की त्यांचा सुरक्षा कर्मचारी, हे आपण तपासून पाहात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे व्हिडीओ चित्रीकरण पुरावा म्हणून सादर करण्यात आले असून आम्ही ते तपासून पाहात आहोत. टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी एफआयआर दाखल केला आहे. जखमी कर्मचाऱ्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यानंतर, तक्रारीत केलेले दावे पडताळून पाहण्यात येणार असून कायदेशीर पाऊल उचलले जाईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (पश्चिम आग्रा) रवी कुमार यांनी सांगितले.
पाच मोटारी व एक बस यांचा समावेश असलेला खासदारांचा ताफा दिल्लीहून इटावाकडे जात असताना एतमादपूर टोल नाक्यावर ही घटना घडली. पोलिसांच्या सांगण्यानुसार, टोल कर्मचाऱ्यांनी ताफ्यातील मोटारींसाठी ११० रुपये मागितले होते. इतर वाहनांसाठी खासदारांच्या ताफ्यातील मोटारी बाजूला घेण्यास सांगितले होते.
आरोप फेटाळले
या संदर्भात खासदार रामशंकर कथेरिया यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, माझ्या सुरक्षा रक्षकांनी टोल कर्मचाऱ्यांना मारहाण केली नाही, त्यांनीच आधी माझ्या लोकांवर हल्ला केला असे त्यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. कथेरिया हे यापूर्वी आग्रा येथून दोन वेळा खासदार होते आणि सध्या ते राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत.