झिम्बाब्वेमध्ये निवडणूकीत गैरप्रकारांचा विरोधकांचा आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/zimbhmbve.jpg)
हरारे (झिम्बाब्वे) – झिम्बाब्वेमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणूकीत अध्यक्ष इमर्शन म्नानगग्वा हे विजयी झाले असले तरी या निवडणूकीमध्ये गैरप्रकार झाल्याचा विरोधकांकडून जोरदार आरोप होऊ लागला आहे. निवडणूकीत पराभूत झालेले विरोधी नेते नेल्सन चामिसा यांनी हा निवडणूक निकाल म्हणजे काळीमा असल्याचे म्हटले आहे.
रॉबर्ट मुगाबे यांच्या दडपशाहीच्या राजवटीनंतर प्रथमच झालेल्या निवडणूकीत म्नानगग्वा हे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. म्नानगग्वा यांनी या निकालांचे जोरदार समर्थन केले आहे. निवडणूकीमध्ये म्नानगग्वा यांना 50.8 टक्के मते निळाली तर चामिसा यांना 44.3 टक्के मते मिळाली.
“लोकशाहीची कोणतीही प्रक्रिया निर्दोष नसते. मुगाबे यांच्या पश्चात झालेली पहिली निवडणूक कोणत्याही गैरव्यवहारांशिवाय पार पडली आहे. मुगाबे यांच्या 37 वर्षांच्या राजवटीनंतरच प्रथमच गैरप्रकारांचा कलंक नसलेली निवडणूक पार पडली आहे.’ असे म्नानगग्वा यांनी म्हटले आहे. सर्व देशवासियांनी एकजूट दाखवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
म्नानगग्वा यांच्या निवडीमुळे झिम्बाब्वे आंतरराष्ट्रीय पातळीवर अलिप्त राहणे बंद होण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेमध्ये विदेशी गुंतवणूकीची नितांत गरज आहे. त्यासाठी म्नानगग्वा यांचे धोरण अनुकूल आहे. निवडणूकीच्या काळात देशात झालेल्या रक्तपाताचा तपास करण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन केला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.