‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी अयोध्या स्थानक दणाणले, शिवसैनिक पोहोचले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/2-13-1.jpg)
अयोध्येत राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेली असतानाच तब्बल ३१ तासांचा प्रवास करुन शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसैनिकांची अयोध्या विशेष ट्रेन शुक्रवारी रात्री १० वाजता अयोध्येत पोहोचली. शिवसेना नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांचे स्वागत केले.
इतक्या तासांचा प्रवास करुन आल्यानंतरही शिवसैनिकांचा उत्साह तूसभरही कमी झालेला दिसला नाही. ट्रेन अयोध्येत दाखल होताच ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सहकुटुंब अयोध्येत दाखल होणार आहेत. सकाळी विशेष विमानाने ठाकरे कुटुंब अयोध्येसाठी रवाना होईल.
दुपारी दोन वाजता हे विमान फैझाबाद विमानतळावर उतरेल. या प्रवासात उद्धव यांच्यासोबत त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकरही असतील. शिवसेनेसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठया संख्येने अयोध्येत दाखल होत आहेत. येत्या रविवारी २५ नोव्हेंबरला भव्य राम मंदिर निर्माणाच्या संकल्पासाठी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होईल. अयोध्येमधील ही गर्दी आणि वातावरण पाहून अनेकांच्या मनात ६ डिसेंबर १९९२ च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अयोध्येला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले असून सर्वत्र कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे.
काय आहे अखिलेश यादव यांची मागणी
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अयोध्येत लष्कर तैनात करण्याची मागणी केली आहे. भाजपाचा सर्वोच्च न्यायालय किंवा संविधानावर विश्वास नाहीय. भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकतो. उत्तर प्रदेशात खासकरुन अयोध्येत जे वातावरण आहे सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेऊन गरज असेल तर लष्कराला तैनात करावे अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे.
राज्य सरकार अलर्टवर
उत्तर प्रदेश सरकारही अलर्टवर असून अयोध्येत मोठया प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अयोध्येला एका किल्ल्याचे स्वरुप आले आहे. अयोध्येत राम भक्त येऊन धार्मिक विधी करु शकतात असे एकाबाजूला सरकार सांगत आहे त्याचवेळी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला प्रचंड सर्तकता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वादग्रस्त जागेवर सद्य स्थिती कायम रहावी. कुठल्याही प्रकारचे उल्लंघन होऊ नये असे स्पष्ट आदेश सरकारने दिले आहेत.