जमावाकडून होणाऱ्या हत्येच्या घटनांना आळा घालण्यासाठी पाऊले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/HANAMARI.jpg)
केंद्र सरकारकडून दोन उच्चस्तरीय समित्यांची स्थापना
नवी दिल्ली – विविध कारणांवरून जमावाकडून होणाऱ्या हत्येच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याचा उद्देश समोर ठेऊन केंद्र सरकारने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. यासंदर्भात उपाय सुचवण्यासाठी सरकारने दोन उच्चस्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. एका समितीचे नेतृत्व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, तर दुसरीचे केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा करणार आहेत.
जमावाकडून होणाऱ्या हत्येच्या घटनांना आळा घालण्यासाठी कायदा केला जावा, असा आदेश आठवडाभरापूूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला. यापार्श्वभूमीवर, सरकारने दोन समित्या स्थापन केल्या आहेत. गौबा यांच्या नेतृत्वाखालील समिती उपाय सुचवणारा अहवाल चार आठवड्यांत सरकारला सादर करेल. या समितीने सुचवलेल्या शिफारसींचा विचार राजनाथ यांच्या नेतृत्वाखालील समिती म्हणजेच मंत्रिगट करेल.
या मंत्रिगटाच्या सदस्यांमध्ये सुषमा स्वराज, नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद आणि थावरचंद गेहलोत या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. हा मंत्रिगट आपल्या शिफारसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर करेल. जमावाकडून होणाऱ्या हत्येच्या प्रकरणांत कठोर कारवाई करण्याच्या सूचना केंद्र सरकारने याआधीच राज्यांना दिल्या आहेत.