जनावरं हा शब्द विस्थपितांच्या गुन्हेगारांना उद्देशून – ट्रम्प यांचा खुलासा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/donaldd-1-1.jpg)
वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्या विदेशी नागरीकांना उद्देशून जनावरं असा शब्द प्रयोग केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. त्या संबंधात खुलासा करताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, बेकायदेशीर घुसखोरी करून हिंसक कृत्ये करणाऱ्या टोळ्यांच्या अनुषंगाने आपण हा शब्दप्रयोग केला आहे आणि आपण तो वारंवार करीत राहु. आज व्हाईट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी खुलासा केला.
हजारोंच्या संख्येने हे लोक अमेरिकेत गुन्हेगारी कृत्य करीत आहेत. त्यांना उद्देशून कॅलिफोर्निया येथील परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी हे विशेषण वापरले होते. त्यांनी एमएस-3 गॅंगच्या विरोधात हा शब्दप्रयोग वापरल्याचा खुलासा व्हाईट हाऊसनेही अधिकृत निवेदनात केला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सारा सॅंडर्स यांनी म्हटले आहे की या टोळ्यांनी बलात्कार आणि हत्यांसारखे प्रकार केले आहेत आणि आपल्या कायद्यांचा गैरफायदा त्यांनी घेतला असल्याने त्यांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रियाही जिकीरीची बनली आहे. त्यामुळे त्यांना उद्देशून ट्रम्प यांनी जनावरे हा शब्दप्रयोग करणे काही चुकीचे ठरत नाही.