जंगलात लागलेल्या आगीत 50 जणांचा मृत्यु
ऍथेन्स (ग्रीस) – ग्रीसची राजधानी ऍथेन्स जवळ जंगलाला लागलेल्या भीषण आगीत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. आगीत अनेक घरे भस्मसात झाली आहेत. यात 26 जणांचे मृतदेह समुद्रकिनाऱ्या जवळील एका सिॉर्टमध्ये सापडले आहेत. आगीचा भडका मोठा असल्यामुळे ती वेगाने पसरत आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून शेकडो लोकांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे. आग समुद्रकिनाऱ्याजवळील भागात लागली आहे.
ऍथेन्सपासून उत्तरपूर्व दिशेला 29 किलोमीटरवर असलेले मती गाव आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. हे गाव पर्यटन स्थळ प्रसिद्ध असून येथे समुद्रकिनारा आहे. त्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. ग्रीस सरकारचे प्रवक्ते दिमित्रीज झानाकोपोलोस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीमुळे आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. धुरामुळे एका सहा महिन्याच्या मुलाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. आगीत सोळा मुले जखमी झाले आहेत. जे लोक आगीमुळे अडकून पडले आहेत; त्यांना बोटी तसेच लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षितस्थळी नेले जात आहे.