चीनमधल्या मुस्लिमांवर अमेरिकेसाठी कपडे बनवण्याची सक्ती
चीनच्या शिनजियांग प्रांतात नजरकैदेत ठेवलेल्या मुस्लिमांवर अमेरिकेसाठी कपडे शिवण्याची सक्ती केली जात आहे. सरकारकडून होणाऱ्या सक्तीमुळे चीनच्या शिनजियांग प्रांतातील मुस्लिम समाजामध्ये मोठया प्रमाणावर अस्वस्थतता आहे. शिनजियांगमध्ये मुस्लिमांना नजरकैदेत ठेवणाऱ्या तळांची संख्या वाढत असून तिथे जवळपास १० लाख मुस्लिमांना ठेवण्यात आले आहे. नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या या मुस्लिमांवर भाषा, धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकण्यात येत आहे. असोसिएट प्रेसने हे वृत्त दिले आहे.
ताब्यात ठेवलेल्या या मुस्लिमांना वस्तू उत्पादनांच्या कामात जुंपण्यात आले आहे. या मुस्लिमांना जिथे ठेवलं आहे त्याला चीन सरकार प्रशिक्षण तळ म्हणत असलं तरी तिथे कोणालाही सहज जाता येत नाही. काटेरी तारांचे कुंपण, सशस्त्र सुरक्षा रक्षक, डॉबरमॅन कुत्रे असा बंदोबस्त तिथे असतो. या तळांच्या बंद दाराआड स्त्री-पुरुषांना अमेरिकन युवा वर्ग आणि स्पोटर्स टीमसाठी कपडे शिवण्याचे काम देण्यात आले आहे.
चीनने या सक्तीच्या नजरकैदेला प्रशिक्षण केंद्र म्हटले आहे. शिनजियांगमधील गरीबी दूर करणे व अल्पसंख्यांक मुस्लिमांना आधुनिक जगाची ओळख करुन देण्यासाठी आम्ही व्यावसायिक प्रशिक्षण देतो असे चीनचे म्हणणे आहे. या तळांवर राहणाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी करार केला आहे असे चिनी अधिकारी सांगतात. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने परदेशी प्रसारमाध्यमांवर प्रशिक्षण केंद्रांबद्दल चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप केला.
पाकिस्तानी पुरुषांच्या मुस्लिम पत्नी बेपत्ता
चीनच्या शिनजियांग प्रांतातून शेकडो पाकिस्तानी पुरूषांच्या चिनी मुस्लीम पत्नी बेपत्ता झाल्या आहेत. मूळचे पाकिस्तानी असलेले चौधरी जावेद अत्ता यांचे शिनजियांग प्रांतात राहणाऱ्या मुस्लिम महिलेबरोबर लग्न झाले. चौधरी जावेद अत्ता यांनी वर्षभरापूर्वी शेवटचे आपल्या पत्नीला पाहिले होते. पत्नीसोबत शिनजियांगमध्ये राहणारे अत्ता हे व्हिसा नूतनीकरणासाठी म्हणून पाकिस्तानला गेले होते. त्या दरम्यान त्यांची पत्नी बेपत्ता झाली.
तुम्ही निघून गेल्यानंतर लगेच ते लोक मला कॅम्पमध्ये घेऊन जातील. त्यानंतर मी कधीही परतून येऊ शकणार नाही हे तिचे अखेरच शब्द होते असे चौधरी जावेद अत्ता यांनी सांगितले. ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांचे पत्नीबरोबर अखेरचे बोलणे झाले होते.